Friday, November 20, 2015

त्वमेव माता च पिता त्वमेव -----

श्री.शरद गजानन ढोले

               त्वमेव माता च पिता त्वमेव 
मा.मुकुंदराव पणशीकर 
 उत्तर कर्नाटकातील होस्पेट येथे  मातंग परीयोजनेची बैठक करून मी ६ नोव्हेंबरला कोल्हापूरला भावाकडे पोहोचलो होतो.७ नोव्हेंबरला  सकाळी मी शाखेतून घरी परतत असतांना दक्षिण कर्नाटक प्रांत संस्कृती प्रमुख श्री.श्रीधरजींचा कुर्ला रेल्वे स्थानक वरून मला फोन आला मुकुंदराव रेल्वेतच बेशुद्ध पडले आहेत.त्यांना हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था करून मी घरी पोहचे पर्यंत निरोप मिळाला कि मुकुंदरावांनी  इहलोकाचा प्रवास संपवला आहे.पोरकेपणाचा सहन न होणारा भार घेऊन मी रात्री मुंबईला पोहचलो.
मा.मुकुंदरावांचे प्रथम  दर्शन मला १९८७ साली चाळीसगावला द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्गात झाले.ते त्या वर्गात बौद्धिक विभागात काम करत होते.पू. गुरुजीवर त्यांचा बौद्धिकवर्ग होता.त्या वेळी त्यांचा बौद्धिक वर्ग मला रुक्ष वाटला होता. मुकुंदराव सुद्धा करारी व रुक्ष वाटले होते. माझा अहंकार मला सांगत होता मुकुंदराव पेक्षा मी चांगला बौद्धिक देवू शकतो.१९८७ ते २०१५ या २८ वर्षात मुकुंदरावनी मला किती बदलवले होते .मुकुंदराव हा ऐकण्याचा विषय नसून ,तो एक अनुभवण्याचा विषय होता.पितृ वियोगाचे दुख: सहन करत मी कोल्हापूर मुंबई प्रवास करत होतो.
करारी  दिसणारे मुकुंदराव व्यक्ति व कार्यकर्त्या बद्दल अत्यंत संवेदनशील होते.बैठकीत वा कार्यक्रमात व्यवस्थेत असणाऱ्या किंवा प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची अगदी तपशीलात काळजी घेत.   त्याला ऐकण्यासाठी पुरेसा वेळ देत, शांतपणाने सर्व विषय लक्षपूर्वक ऐकत.व्यक्तिसाठी व्यक्तिसापेक्ष विचार,पण विचारासाठी व्यक्तिसापेक्ष अथवा परिस्थितीसापेक्ष विचार करत नसत. एखादी जबाबदारी कार्यकर्त्यावर सोपवली कि त्याच्या मागे हिमालयासारखे उभे राहत. प्रत्येक व्यक्तिच्या स्वतंत्र चिंतनाला व प्रयत्नाला ते पूर्ण वाव देत.आपले मत देत पण त्या बद्दल आनाग्रही असत.आपल्या मता पेक्षा वेगळ्या पध्यतिने एखाद्याने काम यशस्वी केले तर ते मोकळया मनाने स्वीकारत.नवीन विषय सहकार्यांच्या मनात संक्रमित करण्यासाठी पूर्ण धीर ठेवत, व आवश्यक तितके वेळा चर्चा व विचार विनिमय करत.साधन शुचितेचा आवश्यक तो पूर्ण आग्रह धरत.ते अजिबात हलक्या कानाचे नव्हते.संवेदनशील असून देखील अनुशासनासाठी त्यांनी अनेक कार्यकर्त्या बद्दल  कठोर निर्णय घेतले.सहज गप्पा मधून सुद्धा कुणाची निंदा किंवा स्तुती ते  करत नसत.एखादा विषय त्याना पटत  नसेल तर त्या वर चुकून सुद्धा सैल प्रतिक्रीया ते देत नसत.त्या विषयाबद्दल ते अलिप्त राहत पण आपल्या मनाशी ते तडजोड करत नसत .त्या मुळे त्यांच्या बद्दल गैरसमज झाला तरी ते स्पष्टीकरण देत नसत . ते अधिकारी असून हि मंचावर बसण्यात वा भाषण करण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. शेकडो प्रसंगात मी त्यांच्या वरील गुणांचा अनुभव घेतला आहे.
मी धाराशिव जिल्ला प्रचारक सन १९८७ ते १९९१ होतो. १९९२ पासून मी जळगावला प्रचारक आलो.माझी राकट व अहंकारी भाषा सुपीक जळगाव मध्ये जरा जास्त बोचरी होती. कार्यकर्ते दुखावले जात होते.मा.मुकुन्दारावनी जळगावची पृष्ठभूमी,जळगावच्या  विशिष्ट समस्येमुळे कार्यकर्त्यांची झालेली हळवी मनस्थिती ,माझा स्वभाव ,बोलणे ,त्याचा परिणाम याचे योग्य विश्लेषण मला स्पष्ट सांगितले.आज २५ वर्षांनी सुद्धा मला ती चर्चा सावध करत असते.त्या वेळी मला वाटले होते ,मा.मुकुन्दरावचा माझ्या बद्दल गैरसमज झाला आहे !
सर्व कार्यकर्त्यांच्या  प्रयत्नाने ३-४ वर्षांनी जळगावला १०० शाखांची पूर्ती झाली.कामाला थोडी गती मिळाली. मला कौतुकाची अपेक्षा होती. मुकुंदराव म्हणाले “काय ढोले पाटील सूर सापडलेला दिसतोय.” नंतरच्या अनेक प्रसंगातून लक्षात आले शरद ऐवजी ते “ढोले पाटील” म्हणाले कि एक तर कौतुकाची थाप असायची किंवा इशाऱ्याचा रट्टा.समजने वाले को इशारा काफी है !
 सन १९९७ साली प्रचारक बैठकित मला मुकुंदराव नी विचारले ,”तुझे कार्यक्षेत्र बदलावे असे वाटते,तुझे मत काय?” हा हि माझ्या साठी नवा अनुभव होता.मी बदलाला होकार दिला पण मी किमान  एक वर्ष इथे राहिलो तर  जळगाव बँकेची समस्या सुटेल व तडवी भिल्ल विषयाला गती मिळेल असा विषय ठेवला, मुकुन्दरावनी माझा बदल रद्द केला.मला नंतर कळाले कि स्थान बदलाची यादी तयार झाली होती.मुकुंदरावनी ती पुन्ह्या लिहिली.सामान्य कार्यकर्त्याच्या मताला पूर्ण किंमत या पेक्षा वेगळी काय असते.मलाही या विषयाचे समाधान झाले कि जनता बँकेची संमस्या सोडवण्यात माझा हि खारीचा वाटा राहिला.आज सुमारे ३००० तडवीनी आपले इस्लामी संस्कार बदलले आहेत.
 सन १९९८ साली शाखा व्यवस्थेतील प्रचारक श्री.संतोष शिंदेला प्रचारक म्हणून धर्मजागरण विभागात काम करायला सांगितले. मी विभाग प्रचारक होतो , प्रयोग नवीन होता परंतु मा.मुकुंदरावनी सर्व ताकद पाठी मागे उभी केली होती.कदाचित संतोष शिंदे धर्मजागरण विभागात काम करणारे देशातील  पहिले  तालुका प्रचारक असावेत. १९९८ पासून नंदुरबार जिल्यात सुरु असलेल्या धर्मजागरण कामाचा परिणाम २०११ च्या जनगणनेत दिसून आला आहे.२००१ च्या जनगणने मध्ये नवापूर तालुक्यात १४१६३ नोंदलेले  ख्रिश्चन होते २०११ जनगणने मध्ये ४८४८ ख्रिश्चन नोंदले आहेत.छुपे ख्रिश्चन तर २०००० पेक्षा जास्त पुन्हा हिंदू झाले.
याच सुमारास नंदुरबार जिल्ह्यामध्ये डॉ.गजानन डांगे  विकास कामा साठी पूर्णवेळ कार्यकर्ते निघावेत व सेवा निधीतून ३ वर्षा साठी त्यांची आर्थिक व्यवस्था व्हावी  असा निर्णय झाला.आज हेडगेवार सेवा समितीच्या माध्यमातून चालणारे कृषी विज्ञान केंद्र ,जन शिक्षण संस्था,आश्रम शाळा,खांडबारा येथील शेती विकास प्रकल्प ,नंदुरबार जिल्ह्या मध्ये गावोगावी असेलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते या सर्वा मागे उभी असलेली अदृश्य शक्ती म्हणजे मा.मुकुंदराव!
 माझे मुख्यालय कल्याणहून सुरतला सन २००५ मध्ये  बदलले.मा.मधुभाई कुलकर्णी क्षेत्रप्रचारक होते.त्या वर्षीच कल्याण आश्रमच्या माध्यमातून २००६ साली शबरीकुंभ करावा असा निर्णय झाला.मधुभाई अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख झाले. मुकुंदराव क्षेत्रप्रचारक झाले.मुकुन्दरावनी मला या व्यवस्थेत जोडले. डांग मध्ये ८ लाख लोकांची व्यवस्था करणे सोपे नव्हते .कुंभ निर्विघ्न पार पाडण्यात धैर्यवान मुंकुंदरावची उपस्थिती फार मोलाची होती. त्या नंतर केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज डांग जिल्ह्याची हिंदू जनसंख्या२०११च्या जनगणनेत  १% ने वाढली आहे. या कालखंडातील मुकुंदरावनी दिलेल्या सलगीचा परिणाम माझ्या जीवनदृष्टी बदलण्यात झाला.२०११ मध्ये झालेल्या मा नर्मदा कुंभाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.३५-४० लाख लोकांनी मा नर्मदे मध्ये स्नान केले.२०११ नंतर विदर्भात सुमारे १.५ लाख लोकांनी घर वापसी केली आहे.असाच परिणाम महाकोशल व छत्तीसगड प्रांतात झाला आहे.धर्मजागरणच्या कामाला या कुम्भामुळे एकदम नवीन आयाम जोडले गेले.व बहुतेक सर्व प्रांतात कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली.
मुस्लीम घरवापसीला वेग द्यायला मुकुंदरावनी विशेष प्रयत्न सुरु केले. त्यांचांच प्रोत्साहनामुळे आज “वंशावली संरक्षण व संवर्धन संस्थान “ जयपूरला आकार घेत आहे.६ विश्व विद्यापीठमध्ये वंशावली लेखनाच्या विविध बिंदूवर राष्ट्रीय संगोस्ठी झाल्या.५००० वंशावली लेखकांची पत्ते सूची असलेली निर्देशिका प्रकाशित झाली.२००० वंशावली लेखकांचे संमेलन १६ सप्टेम्बेर ,२०१५ ला नाशिकमध्ये संपन्न झाले. आमच्या आग्रहामुळे मुकुंदराव मंचावर होते पण भाषण झाले नाही.
२००७ पासून मुकुंदराव धर्मजागरण प्रमुख होते,वाऱ्यासारखा प्रवासकरून त्यांनी संघटनात्मक कामासाठी कार्यतंत्र उभे केले.देशातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची धर्मजागरणाबद्दल समान धारणा व्हावी या साठी नागपूरला ७ ते ९ नवेम्बर २०१४ असा तीन दिवस अभ्यासवर्ग आयोजित केला होता.धर्मजागरणाच्या विविध आयामांची विस्तृत मांडणी या अभ्यास वर्गात झाली. सर्व कार्यकर्त्यांची मा.मोहनजी भागवत सोबत चर्चा व प्रश्नोत्तरे झाली.पुढील कामाची दिशा ठरली.सर्व अभ्यासवर्ग ठरल्याप्रमाणे झाला.देशभरातून १७६० कार्यकर्ते आपेक्षित होते १३४५ उपस्थित होते. या अभ्यासवर्गाचा अनुवर्ती प्रयास म्हणून सर्व प्रांतांनी आपल्या कामाची योजना  जुलैमध्ये मुंबईला झालेल्या बैठकीत ppt द्वारा मांडली. याच बैठकीत संस्कृती समन्वय ,वंशावली संरक्षण व संवर्धन संस्थान, योजक या धर्मजागरण विषयाशी जोडलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी बोलावले होते व त्यांनीदेखील आपली विस्तार योजना मांडली.या बैठकी पूर्वी मुकुंदराव परत एकदा नवयुग कार्यालयात बेशुद्ध पडले.सर्व वैद्यकीय चाचण्या नंतर निदान झाले नाही. नवयुग मध्ये बोलताना ते म्हणाले “आता सिग्नल मिळाला आहे.” माझ्याशी अनेक विषयावर ते सविस्तर बोलले.एका विषयाची व्यवस्था त्यांना लावायची होती तोही कार्यक्रम त्यांनी २ ऑगस्ट २०१५ ला केला.
पश्चिम क्षेत्रात १९९९ पासून व नर्मदा कुम्भानंतर मध्य क्षेत्रात धर्मजागरणच्या कामाने गती घेतली होती. या सर्व वनवासी  क्षेत्रात मिशनरी लोकांचे चर्च द्वारा  व विकासासाठी विविध  स्वयंसेवी द्वारा  अत्यंत सघन जाळे आहे.त्या मुळे ज्या ठिकाणी धर्मांतर थांबले आहे त्या ठिकाणी रोजगार व विकास कामा साठी काम करणे आवश्यक झाले होते. विविध प्रयत्नाने  मार्ग काढण्याचा प्रयास सुरु आहे. याच काळात डॉ. गजानन डांगे यांच्या प्रतिभेतून विकासासाठी नवीन रचनेचा उदय होत होता.मा.भैय्याजी जोशी व अन्य अधिकारी व्यक्तिशी बोलून “योजक” नावाची कंपनी २०१२ मध्ये स्थापन केली.तिचे अनोपचारीक काम २०१० पासून सुरु केले होते, या संवेदनशील क्षेत्रात भारतिय चिंतनावर आधारित ग्रामसमुह विकास असे त्याचे स्वरूप आहे. ५ वर्षे काम केल्यामुळे आता ते लोकासमोर ठेवणे आवश्यक होते. या कामा मागे ५ वर्षे मुकुंदराव अनामिकपणे उभे होते.पाच वर्षात विविध अभ्यासवर्ग, बैठका या मधून ४० ग्रामसमुह नक्की झाले होते.काही ठिकाणी परिणाम दिसू लागले होते,त्या मुळे आता प्रकट होणे आवश्यक होते.२ ऑगस्टच्या कार्यक्रमात मुकुंदरावनी समारोप केला.ते म्हणाले,”१९७१  पासून मी वनवासी क्षेत्रात प्रवास करत आहे. तेथील समस्या समजावून घेऊन उपाययोजना करत आहे. या क्षेत्रात  अनेक  अराष्ट्रीय शक्ती काम करत आहेत. कामाची शहरी भागात ,ग्रामीण भागात, व वनवासी क्षेत्रात आवश्यकता  आहे. पण मध्य भारतातील या क्षेत्रात काम करणे जास्त आवश्यक आहे. कारण हा भाग नैसर्गिक साधन संपन्नतेचा आहे,व लोक गरीब आहेत.काम करणे कठीण आहे.परीक्षेत सोपा प्रश्न  आधी सोडवतात  आम्ही अवघड प्रश्न आधी सोडवायचा ठरवले आहे.योजकची कल्पना डॉ.गजानन डांगे यांच्या स्वतंत्र प्रतिभेतून विकसित झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचा त्याना अनुभव आहे,आम्ही  कामात यशस्वी होऊ या विश्वासाने काम सुरु केले आहे.हा केवळ प्रयोग नाही.हे समजून घेऊन या कामासाठी सर्वांनी तन मन धनाने मदत करावी.”  योगायोगाने हे भाषण टेप झालेले आहे. मुकुंदरावांचे सार्वजनिक जीवनातील हे अखेरचे भाषण ठरले.
२६ आक्टोबरला ते रांचीच्या अखिल भारतीय बैठकीला जाणार होते. त्या पूर्वी मी २०११ च्या जनगणने मध्ये धर्माजागरणाच्या प्रयत्नाने झालेले बदल दाखवले होते. आनंदाने ते म्हटले ,”दिशा तर बरोबर आहे”.त्यांनी दाखवलेल्या दिशेने जाणे हेच आता काम आहे
रांचीला जाताना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची पत्ता सूची नवीनतम केली होती. दक्षिण भारतासाठी मला वितरणाची सूचना दिली होती .मी होस्पेटला सर्वांना पुस्तिका दिल्या. ६ नोवेम्बेरला त्यांचा मला या विषयाची चौकशी करण्यासाठी  फोन आला . ९ नोव्हेंबरला भेट ठरली होती. परंतु नियतीच्या मनात वेगळे होते. ८ नोवेम्बेरला त्या पत्तासुचीच्या आधाराने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना शोक संदेश कळवला. मुकुंदराव न भेटता गेले. पोरके करून गेले. १९८७ ते २०१५ दरम्यान वेळोवेळी कित्तेक गोष्टी त्यांनी मला कळत न कळत शिकवल्या आहेत ,दुरुस्त केल्या आहेत योग्य संघ दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे.मला सहन केले आहे  त्यामुळे  मनात सहज  विचार आला . त्वमेव माता च पिता त्वमेव--------

                               शरद गजानन ढोले.(9426479489)
                                                             dhole.sharad@gmail.com